ENG vs IND : इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स यांच्यात 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात आली. टीम इंडियाने ही मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली. भारताची इंग्लंडमध्ये टी 20I मालिका जिंकण्याची पहिलीच वेळ ठरली. त्यानंतर आता उभयसंघात आज 16 जुलैपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील सलामीचा सामना हा द रोझ बाउल, साउथहॅम्प्टन येथे आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 5 वाजता टॉस झाला आहे.
एकदिवसीय मालिकेत इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. इंग्लंडने टीम इंडिया विरुद्ध बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज यजमानांना किती धावांवर रोखण्यात यशस्वी ठरतात याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दोघांपैकी वरचढ कोण? पाहा आकडे
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया वूमन्स यांच्यात एकूण 76 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. इंग्लंडने या 76 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. इंग्लंडने भारतावर 40 सामन्यांमध्ये मात केली आहे. तर टीम इंडियाने इंग्लंडचा 34 सामन्यांमध्ये धुव्वा उडवला आहे. तर उभयसंघातील 2 सामन्यांचा निकाल लागला नाही.
रोझ बाउलमध्ये किती सामने झालेत?
रोझ बाउलमध्ये आतापर्यंत एकूण 36 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी 17 सामन्यात पहिले फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाचाही तितक्याच वेळेस विजय झाला आहे.
ENG vs IND: सामना कुठे पाहता येणार?
दरम्यान इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळतील. तर हेच सामने मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहता येतील.
इंग्लंड वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : टॅमी ब्यूमोंट, एमी जोन्स (विकेटकीपर), एम्मा लॅम्ब, नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), सोफिया डंकले, अॅलिस डेव्हिडसन रिचर्ड्स, चार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, केट क्रॉस, लॉरेन फायलर आणि लॉरेन बेल.
टीम इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : प्रतीका रावल, स्मृती मंधाना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, श्री चरणी आणि क्रांती गौड.