Sanjay Raut: बाजीराव पेशवे मांसाहार करायचे, पण आता 15 ऑगस्टला मांस-मासे विक्रीवर बंदी घालून महाराष्ट्राला शाकाहारी राज्य बनवण्याचा प्रयत्न होतोय का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मर्द मराठ्यांच्या महाराष्ट्राला शाकाहारी राज्य म्हणून घोषित केलंय का?
मुंबई, पुणे, डोंबिवलीसारख्या शहरांमध्ये अनेक सोसायटींमध्ये मांस-मासे खाणाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही, घर दिलं जात नाही. याविरोधात संघर्ष सुरूच आहे. आता स्वातंत्र्यदिनी महानगरपालिका फतवा काढते आणि मांस-मासे विक्रीवर बंदी आणते,” असे म्हणत राऊत यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला.
“15 ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्यदिन आहे. लोकांनी आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. हा धार्मिक उत्सव नाही, हा शौर्याचा दिवस आहे. या दिवशी आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. ते स्वातंत्र्य नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळालेलं नाही. या स्वातंत्र्यासाठी रक्तपात, हिंसा झाली. त्यावेळी BJP ची आत्ताची विचारसरणी, मांस-मासे न खाणारे, ते कुठेही नव्हते,” अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली.
“स्वातंत्र्यदिनी मांसाहार बंदी? हे नवीन थोतांड कोणाचं?”
“स्वातंत्र्यदिनी मांसाहार बंदीचं हे नवीन थोतांड कोणाचं आहे? याची मागणी कोणी केली? फडणवीस म्हणतात, काँग्रेसच्या काळात… काँग्रेस सोडा, तुमचं बोला! तुमच्या स्वप्नात, छातीवर काँग्रेस बसलेली आहे. आम्ही बसलेलो आहोत. काहीही विचारा, काँग्रेसच्या काळात, नेहरूंच्या काळात… तुम्ही महाराष्ट्राला नपुंसक बनवताय का? छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले, तेव्हा मावळे वरण-भात, तूप खाऊन लढत होते का? ते मांसाहार करायचे.
बाजीराव पेशवे मांसाहार करायचे, त्याशिवाय युद्ध लढता येत नाही. सीमेवर सैन्याला मांसाहार करावा लागतो. वरण, भात, तूप, पोळी, श्रीखंड-पुरी खाऊन युद्ध लढता येत नाही. तुम्ही महाराष्ट्राला नपुंसक, नरम बनवताय. हे फतवे मागे घ्या, फडणवीस!” असे राऊत यांनी सुनावले.
शरद पवारांच्या काळात काय झालं?
“मराठी माणसाचे संस्कार, संस्कृती तुम्ही नष्ट करताय. स्वातंत्र्यदिनी मांसाहार करायचा नाही, तुम्ही नका खाऊ. तुम्ही लपून खाताय, मग लोकांवर बंदी का लादता? हा देश आहे की बंदीशाळा? हे बंदीराष्ट्र झालंय का?” असा थेट सवाल राऊत यांनी विचारला. अजित पवार म्हणतात, मांस-मासे विक्रीवर बंदी घालणे योग्य नाही. BJP चे लोक दावा करतात की शरद पवार मुख्यमंत्री असताना हा निर्णय झाला. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.
“शरद पवारांच्या काळात असा फतवा? थोतांड आहे!”
“शरद पवार मुख्यमंत्री असताना किती वर्षे झाली? शरद पवार शेवटचे मुख्यमंत्री कधी होते, हे फडणवीसांना माहीत आहे का? मनोहर जोशी २५-३० वर्षांपूर्वी मुख्यमंत्री होते. त्याआधी पवारसाहेब होते. तुम्ही कोणते अध्यादेश काढताय? याची मागणी कोणी केली? शरद पवारांच्या काळात मांस-मासे विक्रीवर बंदीचा अध्यादेश निघाला असेल, तर मला आश्चर्य वाटेल. असं काही झालेलं नाही, हे थोतांड आहे!” असे संजय राऊत यांनी ठणकावले.